♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

उधना–अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसला नांदुरा स्थानकावर थांबा ! प्रवाशांच्या एकजुटीचे फलित; MH 56 प्रवासी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

 

MH 28 News Live / नांदुरा : नांदुरा रेल्वे स्थानकावर अधिकाधिक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा आणि परिसरातील प्रवाशांना रेल्वे प्रवासाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी MH 56 प्रवासी संघटनेच्या वतीने सातत्याने करण्यात येत असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आणि आमदार चैनसुखजी संचेती यांच्या प्रयत्नांतून उधना–अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसला नांदुरा रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाला आहे.

या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी MH 56 प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेगाडीचे ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी गाडीचे लोको पायलट आणि गार्ड यांचा सन्मान करण्यात आला. नांदुरा व परिसरातील प्रवाशांसाठी हा थांबा महत्त्वपूर्ण ठरणार असून, प्रवाशांची सोय होण्यास मदत होणार आहे.

नांदुरा रेल्वे स्थानकावर अधिक गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी संघटनेने वेळोवेळी निवेदने देऊन रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची जोड मिळाल्याने उधना – अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसच्या थांब्याचा मार्ग मोकळा झाला. संघटितपणे आणि सातत्याने लोकहिताच्या मागण्या मांडल्यास त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो, हे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.

या स्वागतप्रसंगी MH 56 प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव घनोकार, उपाध्यक्ष किशोरराव देशमुख, ZRUCC सदस्य स्वप्निलजी झांबड, अतिक अहमद सर, विजयजी डवंगे, जितेंद्र थावराणी, निमिष शर्मा, संजय नाईक आदी उपस्थित होते. नांदुरा रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास व्हावा, अधिक एक्सप्रेस गाड्यांना थांबे मिळावेत आणि प्रवाशांच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी MH 56 प्रवासी संघटनेचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129