
पहाटे हुडहुडी तर दुपारी उन्हाच्या झळा; तापमानातील तफावत वाढली
MH 28 News Live, बुलढाणा : राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कमाल तापमानाचा पारा पस्तिशीपार गेला असतानाच किमान तापमानात घसरण झाल्याने राज्यात गारठा वाढला आहे.
कमाल-किमान तापमानातील तफावत वाढल्याने पहाटे हुडहुडी तर दुपारी उन्हाच्या झळा अशीच स्थिती अनुभवायला मिळत आहे. १२ फेब्रुवारीला सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानातील घट कायम आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. पुणे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद येथेही किमान तापमानात घट झाल आहे. राज्याच्या किमान तापमानातील घसरण कायम राहण्याची शक्यता आहे. निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाचा चटका प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान पस्तिशीपार गेले असल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. सोलापूर, वर्धा येथे तापमान ३६ अंशांवर पोचले असून, अनेक ठिकाणी पारा ३५ अंशाच्या वर सरकला आहे. कमाल आणि किमान तापमानात १६ ते ३० अंशांपर्यंत तफावत दिसून येत आहे. त्यामुळे पहाटे गारठा असतानाच, दुपारच्या वेळी उन्हाचा झळा असह्य होत आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी-अधिक होत आहे. रविवारी (ता. १२) राजस्थान येथील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३५.७ (१०.७), जळगाव ३४.४ (१०.१), धुळे ३४.०(९.०), कोल्हापूर ३४.८(१८.७), महाबळेश्वर ३१.४ (१६.४), नाशिक ३३.५ (१०.२), निफाड ३५.२ (५.५), सांगली ३५.४ (१७.७), सातारा ३५.२ (१४.४), सोलापूर ३६.६ (१६.६), सांताक्रूझ ३४.४ (१६.६), डहाणू ३१.१ (१७.६), रत्नागिरी ३४.०(१७.५), औरंगाबाद ३४.४ (१०.४), नांदेड ३४.८ (१६.२), परभणी ३५.७(१५.६), अकोला ३७.४ (१४.५), अमरावती ३५.८(१४.१), बुलडाणा ३३.०(१७.०), ब्रह्मपुरी – (१६.८), र्चद्रपूर ३४.४(१८.५), गडचिरोली ३२.६(१२.८), गोंदिया ३४.२ (१३.८), नागपूर ३५.८ (१५.८), वर्धा ३६.५(१५.८), यवतमाळ ३५.० (१४.५).
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button