
चिखलीत गुटखा माफियांवर थातुरमातुर कारवाई; ‘मोठे मासे’ कुठे ? अन्न व औषध प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित !
MH 28 News Live / चिखली : गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने १० ऑगस्ट रोजी चिखलीतील बाबू लॉज चौक परिसरातील केजीएन पान मसाला सेंटरवर थातुरमातूर कारवाई केल्याची माहिती आहे. अन्न व औषध अधिकारी अक्षय भोपळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पान मसाल्याचा एकूण १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चिखली पोलिसांचे कर्मचारी व पंचांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईत सय्यद समीर सय्यद असगर (वय २०, रा. चिखली) याला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, या कारवाईबाबत आता काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, प्रशासनाच्या कारवाईची नेमकी वस्तुस्थिती काय, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
जप्त मुद्देमालामध्ये व्ही-१ सुगंधित टोबॅकोची १०५ पॅकेट, पान मसाल्याची १४ पॅकेट आणि रजनीगंधाची ४ पॅकेट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी बीएनएस तसेच अन्न व औषध मानके संबंधित कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात आली असून, अधिकारी अक्षय भोपळे यांच्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे.
न. प. गाळ्यात कारवाई; मात्र एफआयआरमध्ये वेगळेच ठिकाण ?
या कारवाईबाबत सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे कारवाईचे प्रत्यक्ष ठिकाण आणि एफआयआरमध्ये नमूद केलेले ठिकाण. उपलब्ध माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी कारवाई नगरपरिषदेच्या गाळ्यात झाल्याचे सांगितले जात असताना, एफआयआरमध्ये ठिकाण ‘केजीएन पान मसाला सेंटर, बाबू लॉज चौक’ असे नमूद करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाईचे ठिकाण नेमके कोणते, याबाबत स्पष्टता निर्माण होणे आवश्यक आहे. कारवाईचा पंचनामा, जप्ती पंचनामा आणि एफआयआरमध्ये ठिकाणाची नोंद एकसारखी आहे का, याची पडताळणी होणे गरजेचे आहे.
एका गाळ्यात लाखोंचा माल असल्याची चर्चा; मग तपास का नाही ?
चिखली शहरात प्रतिबंधित गुटख्याची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा असताना, ज्या परिसरात कारवाई करण्यात आली त्या भागातील इतर संशयित गाळ्यांचीही तपासणी झाली का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः एका गाळ्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित माल असल्याची चर्चा असतानाही त्या गाळ्याची तपासणी झाली नसल्याचा आरोप केला जात आहे. जर अशी माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आली असेल, तर त्या ठिकाणी तपासणी का करण्यात आली नाही ? हा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
कारवाईत ‘चुका’ झाल्याची चर्चा; प्रशासनाने खुलासा करावा
या कारवाईदरम्यान अन्न व औषध अधिकारी अक्षय भोपळे यांच्याकडून काही त्रुटी झाल्याची चर्चा आहे. विशेषतः दुकानावर प्रत्यक्ष बसलेली व्यक्ती आणि एफआयआरमध्ये फिर्यादीत नमूद केलेली व्यक्ती वेगळी असल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र, या बाबींना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे केवळ चर्चेच्या आधारे निष्कर्ष काढण्याऐवजी प्रशासनाने कारवाईशी संबंधित कागदपत्रे आणि वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे. पंचनामा, जप्तीची नोंद, एफआयआर आणि प्रत्यक्ष घटनास्थळ यामध्ये तफावत आहे का, याची चौकशी झाल्यास सत्य समोर येऊ शकते.
पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अवैध धंदे ?
बाबू लॉज चौक हा पोलीस ठाण्यापासून जवळचा परिसर असल्याचे सांगितले जाते. परिसरात पोलीस चौकीही असल्याची चर्चा आहे. असे असतानाही गुटखा, वरली-मटका आणि अन्य अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नगरपरिषदेचे अथवा अन्य व्यावसायिक गाळे अशा गैरप्रकारांसाठी वापरले जात नाहीत ना, याची प्रशासनाने नियमित तपासणी करण्याची गरज आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याची चर्चा असताना केवळ १४ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करून एका दुकानावर कारवाई करणे पुरेसे आहे का, हा सवालही उपस्थित होत आहे.
साडेतीन तासांच्या कारवाईचे गूढ कायम
सदर कारवाई तब्बल तीन ते साडेतीन तास चालल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एवढा वेळ कारवाई का चालली, त्या कालावधीत नेमकी कोणती प्रक्रिया करण्यात आली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. कारवाईदरम्यान आरोपी बदलल्याबाबत किंवा ‘गोड बंगाल’ झाल्याबाबत कुजबूज असल्याची चर्चा आहे; मात्र त्याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे अशा चर्चांना खतपाणी न घालता प्रशासनाने कारवाईची संपूर्ण वस्तुस्थिती पारदर्शकपणे मांडणे गरजेचे आहे.
‘मोठे मासे’ कधी जाळ्यात ?
गुटख्याच्या अवैध व्यवसायावर खऱ्या अर्थाने आळा घालायचा असेल, तर केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून उपयोग नाही. प्रतिबंधित गुटख्याचा पुरवठा करणारे, साठवणूक करणारे, मोठ्या प्रमाणावर माल वितरित करणारे आणि आर्थिक साखळीतील प्रमुख व्यक्तींपर्यंत तपास पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे १४ हजार ६०० रुपयांच्या मुद्देमालाची कारवाई ही केवळ एक घटना न राहता त्यातून मोठ्या साखळीचा छडा लागणार का, याकडे चिखलीकरांचे लक्ष लागले आहे.
ही कारवाई केवळ दिखावा ठरते की गुटखा माफियांविरोधातील व्यापक मोहिमेची सुरुवात ठरते, हे आगामी तपासातून स्पष्ट होईल. मात्र, कारवाईचे ठिकाण, एफआयआरमधील नोंदी, तपास न झालेल्या कथित गाळ्यांचा मुद्दा आणि आरोपीबाबतच्या चर्चांमुळे प्रशासनासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या सर्व प्रश्नांवर अन्न व औषध प्रशासनाने स्पष्टता देणे आवश्यक आहे. अखेर चिखलीकरांचा सवाल एकच ‘‘छोटे मासे’ जाळ्यात सापडले; पण ‘मोठे मासे’ नेमके कुठे आहेत?



